सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणावर निर्बंध घालण्यात आले असून, कोणत्याही खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट संस्था किंवा छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोनचा वापर करण्यापूर्वी किमान ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे आणि केंद्रीय संस्थांचा समावेश असल्याने ड्रोनचा वापर दहशतवादी टेहळणीसाठी किंवा अतिरेकी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यांत रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया टेहळणीसाठी तसेच इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी ड्रोनचा वापर करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून तसेच तत्सम हवेत उडणाऱ्या सर्व साधनांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आवश्यक परवानगीशिवाय अशा साधनांचा वापर करता येणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन करून पोलीस परवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण करताना कोणी आढळल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहिता कलम २३३ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे चित्रीकरण होताना दिसले होते. त्या वेळी संबंधितांनी आवश्यक परवानगी घेतली होती का, याबाबत चर्चा रंगली होती. आता प्रशासनाने कडक नियम लागू केल्याने यापुढे या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार का आणि विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
