सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर वाचनालयाच्या १४ व्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर कार्यकारी मंडळाची पदनिहाय निवड बिनविरोध पार पडली असून, वाचनालयाच्या अध्यक्षपदी मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
गेली ४७ वर्षे सोमेश्वर वाचनालय वाचक, सभासद तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना मोफत व अल्प दरात दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून देत आहे. या सुविधेचा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता वाचनालयाची सन २०२६–२७ मधील पहिली मासिक बैठक पार पडली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचे गुलाबपुष्प व ग्रंथ भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यकारी मंडळाची पदनिहाय निवड सर्वानुमते करण्यात आली.
यामध्ये कार्याध्यक्षपदी प्रा. किरण मोरे, कोषाध्यक्षपदी योगेश महाले, कार्यवाहपदी विनायक आगम, उपकार्यवाहपदी राजू मदने, अंतर्गत हिशोब तपासणीस प्रा. डॉ. नारायण राजुरवार व अभिजीत सणस यांची निवड झाली.
तसेच स्वीकृत तज्ञ सदस्य म्हणून राजेंद्र यादव (कार्यकारी संचालक, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.), प्राचार्य प्रमोद जगताप, प्रा. राहुल गोलांडे आणि शुभांगी खैरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांना पदनिहाय कार्यभार सोपविण्यात आला. बैठकीचे आयोजन ग्रंथपाल अजित जगताप यांनी केले. बैठकीचा समारोप चहापानाने करण्यात आला.
