बारामती l सुप्यातील अहिल्यादेवी डायमंड चौकात पुन्हा भीषण अपघात; महिला गंभीर जखमी : कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
 बारामती तालुक्यातील सुपे येथील अहिल्यादेवी डायमंड चौकात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून मालवाहतूक ट्रकच्या धडकेत एका महिलेस गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या काही दिवसांत या चौकात वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
     या अपघातात सुनंदा अरुण गायकवाड (वय ५५, रा. वरवंड, ता. दौंड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
     मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा गायकवाड या सुपे येथील आठवडे बाजार करून वरवंड येथे जाण्यासाठी सुपे–मोरगाव चौफुल्याकडे वळणारा रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मालवाहतूक ट्रकने (क्र. एमएच १६ बीसी ४२१५) त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा हाताला व पायाला गंभीर दुःखापत झाली आहे. येथील स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना सुपे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बारामती मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस करीत आहेत.
      दरम्यान, अपघातावेळी संबंधित ट्रकचालक मोबाईल फोनवर बोलत असल्याचे चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्याच्या याच निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
    याच अहिल्यादेवी डायमंड चौकात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात शेंडगेवाडा येथील सख्खे भाऊ सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे व शुभम दत्तात्रय ठोंबरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
To Top