सोमेश्वर रिपोर्टर टीम----
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी पुरंदर तालुक्याचा दौरा करून विविध आरोग्य संस्था, पालखी विसावा स्थळे आणि पाणी शुद्धीकरण केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
डॉ. पवार यांनी दिवे येथील आरोग्य उपकेंद्र, काळेवाडी येथील टँकर पॉइंट, झेंडेवाडी येथील पालखी विसावा ठिकाण तसेच सासवड ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. पालखी सोहळ्याच्या काळात अतिदक्षता विभागाची व्यवस्था, प्रथमोपचार कक्षांची उभारणी आणि भाविकांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
याशिवाय पालखी मार्गावरील हॉटेलांची तपासणी करून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत हॉटेल चालकांना निर्देश देण्यात आले. बोरावके मळा टँकर पॉइंट, शिवरी, साकुर्डे, जेजुरी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे, सुकलवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथेही भेट देऊन नियोजनाची पाहणी करण्यात आली.
पालखी सोहळ्यादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क राहून भाविकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा द्यावी, अशा सूचना डॉ. पवार यांनी दिल्या.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रकाश चौरे, तालुका आरोग्य निरीक्षक शिवाजीराव भोसकर, राहुल टकले तसेच आरोग्य निरीक्षक विजय सोनवणे, रविंद्र मोहिते, बाप्पू बंडलकर, संदीप व्हनगाडे आदी उपस्थित होते.
