Sugar Factory l सोमेश्वर कारखाना निवडणुकीचे पडघम; प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची शक्यता

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळ निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून प्रारूप मतदार याद्या दि. २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून, त्यानंतर हरकती, दुरुस्त्या आणि अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पार पडणार आहे.
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार असल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. विविध गटांकडून मतदार याद्यांची छाननी करण्यास सुरुवात होणार असून, संभाव्य उमेदवारांनीही राजकीय हालचालींना वेग दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखाना परिसरात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, विविध पॅनेलच्या स्थापनेसह रणनीती आखण्याचे कामही सुरू झाले आहे. आता प्रारूप मतदार याद्यांनंतर येणाऱ्या हरकती, अंतिम मतदार यादी आणि निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेकडे सभासद व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दि. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ही यादी प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग कार्यालय, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नोटीस बोर्ड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बारामती तसेच तहसीलदार कार्यालय, बारामती येथे उपलब्ध राहणार आहे.
प्रारूप मतदार यादीवर हरकती व आक्षेप २४ जुलै ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत स्वीकारले जाणार असून, त्यावरील निर्णय १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत दिला जाणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून, आता इच्छुक उमेदवार, सभासद आणि विविध गटांच्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कारखाना परिसरात निवडणुकीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
To Top