सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या का-हाटी शाखेत बनावट कागदपत्रे व खोट्या सह्या खाते काढून त्यावरील रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फोंडवाडा (ता. बारामती) येथील सतिश हरिश्चंद्र पिसाळ व त्याची पत्नी आशा सतिश पिसाळ दोन्ही रा. फोंडवाडा, माळवाडी ता. बारामती जि. पुणे यांच्यावर सुपे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात धनश्री जयवंत पिसाळ वय 32 वर्षे व्यवसाय नोकरी, मुळ रा. फोंडवाडा, माळवाडी ता. बारामती जि. पुणे सध्या रा. लेन नंबर 3, आनंदनगर सोसायटी, माळवाडी, हडपसर यांनी सुपे पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
वास्तविक, धनश्री पिसाळ या 2017 मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये होत्या. 2018 मध्ये धनश्री यांचे वडील जयवंत महिपती पिसाळ यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांची एकत्रित शेती, व सामायिक कागदपत्रे यासाठी धनश्री यांनी त्या सतत अमेरिकेत असल्यामुळे स्वतःचे आधार कार्ड व पॅन कार्ड चुलत भाऊ सतीश पिसाळ यांच्याकडे विश्वासाने दिले होते.
10/11/2017 रोजी ते दि. 25/03/2024 रोजीपर्यत का-हाटी ता. बारामती गावचे हद्दीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या का-हाटी शाखेत येथे सतीश पिसाळ व त्यांच्या पत्नी आशा पिसाळ यांनी संगनमताने फिर्यादीच्या संमत्तीशिवाय व माहीतीशिवाय त्यांची बनावट कागदपत्रे व स्वाक्ष-या तयार करून व त्या ख-या असल्याचे भासवुन खाते उघडले. त्या खात्याला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक केला. धनश्री जयवंत पिसाळ नावाचे बँक खाते उघडुन अपहार केला आहे.
त्या खात्यामधून 32 लाख 20 हजार 40 रुपये खोट्या साह्यांच्या आधारे काढून ते धनश्री पेट्रोलियम हया बँक खात्यात वर्ग केलेले आहेत. याशिवाय धनश्री यांची कागदपत्रे त्यांच्या संबंधी शिवाय कर्ज काढण्यासाठी वापरली आहेत. धनश्री यांचे बंधू धनराज पिसाळ यांनी नुकताच आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सतीश पिसाळ यांच्यासह नऊ जणांवर मांजरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची चौकशी पोलिसांकडून होत असताना सतीश पिसाळ यांच्या या बोगस खात्याची, व खोट्या सह्या करून केलेल्या अपहाराची माहिती धनश्री यांच्यासमोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सुपे पोलिसांनी धनश्री यांच्या फिर्यादीवरून सतीश पिसाळ व आशा पिसाळ या पती-पत्नींवर गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.
