Baramati Crime l पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत आरोपी जेरबंद; तीन साथीदार फरार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी 
कमरेला गावठी पिस्तूल खोचून साथीदारांसह फिरणाऱ्या सराईत आरोपीला बारामती शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून जेरबंद केले. प्रदीप सुरेश नकाते (वय २७, रा. महात्मा फुलेनगर, आमराई, बारामती) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच्यासोबत असलेले तीन संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दिनांक ९ ऑगस्ट रोजी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रदीप नकाते हा कमरेला पिस्तूल बाळगून काही साथीदारांसह फिरत असून, त्याच्या साथीदारांकडे कोयत्यासारखी घातक हत्यारे आहेत. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत कारवाईचे नियोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले यांनी ही माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून गोपनीय पद्धतीने सापळा रचला.
योग्य संधी साधून पोलिसांनी प्रदीप नकाते याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला खोचलेले काळसर रंगाचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आढळून आले. पिस्तुलाच्या मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पिस्तुलाची अंदाजे किंमत २५ हजार रुपये, तर दोन काडतुसांची किंमत ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२२/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच नकाते याच्यासोबत असलेले इतर इसम घटनास्थळावरून पसार झाले. तपासादरम्यान अजय नंदकुमार सकट, रोहित अशोक सोनवणे आणि गणेश पाठक, सर्व रा. आमराई, बारामती, यांची नावे संशयित म्हणून निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय करण्यात आली आहेत.
आरोपीकडून पुन्हा शस्त्र जप्त विशेष म्हणजे, प्रदीप नकाते याच्याविरुद्ध यापूर्वीही शस्त्रविषयक गुन्हा दाखल आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याच्याकडून गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३९/२०२५ नोंदवून शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा बेकायदेशीर अग्निशस्त्र मिळून आल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
शस्त्र कुठून आले? साथीदारांचा सहभाग काय?

हे गावठी पिस्तूल आरोपीकडे कुठून आले, ते कोणी पुरविले, त्यामागे कोणती शस्त्रपुरवठा साखळी आहे, तसेच आरोपी व त्याच्या साथीदारांचा एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या नियोजनाशी संबंध होता का, या सर्व बाबींचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. फरार संशयितांकडे नेमकी कोणती हत्यारे होती आणि त्यांचा या प्रकरणातील सहभाग काय आहे, याचाही तपास केला जात आहे.

तीन वर्षांत सहा अग्निशस्त्रे हस्तगत
या कारवाईतील महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांच्या गोपनीय माहिती संकलनाच्या आधारे २०२४, २०२५ आणि २०२६ या तीन वर्षांत बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहा अग्निशस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. स्थानिक पातळीवर उभारलेल्या विश्वासार्ह माहिती-जाळ्यामुळे बेकायदेशीर शस्त्रांवर प्रभावी कारवाई करण्यात पोलिसांना यश मिळत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव विष्णू क्षीरसागर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. फरार संशयितांचा शोध घेण्याबरोबरच शस्त्राचा मूळ स्रोत आणि संभाव्य शस्त्रपुरवठादारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील तसेच तपास पथकातील अक्षय सिताफ, ज्ञानदेव क्षीरसागर, यशवंत पवार, गिरीश नेवसे, सागर जामदार, विशाल शिंदे, कवितके, विजय ओंबासे व विशाल चौधरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
To Top