सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे ग्रामपंचायत व शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेला बोगस ड्रायव्हिंग लायसन्स शिबिर चर्चेचा विषय ठरले आहे.मात्र या शिबिराच्या माध्यमातून विना परिक्षा लायसन्स काढून देण्याच्या नावाखाली आकारण्यात येणारे शुल्क व शिबिराची अधिकृतता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, हे शिबिर बोगस सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिवहन विभागाने घटनास्थळी भेट दिली मात्र या पुढील कारवाई झाली का ? याबाबत प्रश्न उपस्थित झालाय
यावेळी प्रसिद्ध करण्यात एका वाॅस्टअप ग्रुपचा पत्रकात आधारे दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, अवजड वाहन तसेच इतर वाहनांच्या परवान्यांसाठी वेगवेगळे दर नमूद करण्यात आले आहेत. काही प्रकारांसाठी तीन ते साडेसात हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार असल्याचे दिसले आहे. तसेच लर्निंग व पक्क्या परवान्यासाठी स्वतंत्र रक्कम नमूद करण्यात आली आहे.
शिबिरासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचेही जाहिरातीत नमूद करण्यात आले असून, नागरिकांनी विविध संपर्क क्रमांकांवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे अधिकार कोणत्या अधिकृत यंत्रणेला आहेत, संबंधित शिबिराला प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) मान्यता आहे का, तसेच नागरिकांकडून आकारण्यात येणारे शुल्क अधिकृत आहे का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. मात्र याचे कुठलेही निकष या ठिकाणी पाळण्यात आलेले नाहीत.
ग्रामपंचायतीच्या नावाचा वापर करून असे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याने प्रशासनाने याची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिबिर अधिकृत असल्यास संबंधित परवानगी व प्रक्रिया जाहीर करावी, तर बोगस असल्यास आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
या प्रकरणात बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सुपेकरांचे लक्ष लागले आहे.
