इंदापूर l डाळज क्र. २ येथे अधिकृत बस थांबा असूनही बसेस थांबेनात ! ग्रामस्थांची परिवहन मंत्र्यांकडे धाव

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील डाळज क्रमांक २ हे परिसरातील सात ते आठ गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्रमांक २ येथे राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत बस थांबा असतानाही अनेक पात्र एसटी बसेस येथे थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भिगवण येथे भेट घेऊन निवेदन दिले.
डाळज क्रमांक २ येथील बस थांब्याबाबत यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लोकप्रतिनिधी तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पत्र, मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि डाळज क्रमांक १, २ व ३ ग्रामपंचायतींचे ठराव यासह विविध कागदपत्रे ग्रामस्थांनी जपून ठेवली आहेत. वरिष्ठ पातळीवरून आदेश व निर्देश असतानाही त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
डाळज क्रमांक २ हे पिलेवाडी, कळस, कुंभारगाव, भादलवाडी, डाळज क्रमांक १ आणि डाळज क्रमांक ३ यासह परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. या गावांतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगार तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी ये-जा या ठिकाणी असते. त्यामुळे अधिकृत बस थांबा असूनही एसटी बसेस न थांबणे हा प्रवाशांसाठी मोठा अडथळा ठरत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित चालक व वाहकांना वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची प्रत दाखवून बस थांबविण्याची विनंती केली असता, ‘आमच्या मशीनमध्ये हा थांबा नाही,’ असे सांगितले जाते. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाचे आदेश कागदावर असले तरी त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या प्रश्नाबाबत माजी जलसंपदा अधिकारी अजिनाथ जगताप व कुणाल जगताप यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भिगवण येथे भेट घेतली. यावेळी डाळज क्रमांक २ येथील बस थांब्याची संपूर्ण माहिती, यापूर्वीचे आदेश, लोकप्रतिनिधींची पत्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश तसेच ग्रामपंचायतींचे ठराव मंत्र्यांसमोर सादर करण्यात आले.
अधिकृत बस थांबा असताना पात्र एसटी बसेस थांबत नसतील, तर संबंधित यंत्रणेकडून याची तातडीने दखल घेऊन आदेशांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित प्रश्नावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, डाळज क्रमांक २ येथील अधिकृत बस थांब्यावर सर्व पात्र एसटी बसेस थांबण्यासाठी संबंधित यंत्रणेने स्पष्ट सूचना देऊन चालक-वाहकांच्या मशीनमध्येही हा थांबा तत्काळ अपडेट करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ‘अधिकृत आदेश असूनही बस थांबत नसेल, तर आदेशांचा उपयोग काय?’ असा सवाल करत ग्रामस्थांनी हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
To Top