सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जेईई (बी.आर्किटेक्चर) आणि नाटा (NATA) या राष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्चर प्रवेश परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या चिंचवड येथील एआयसीटी डिझाईन अकादमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे अकादमीच्या शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक आणखी उंचावला आहे.
या परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कृष्णा कल्याणकर, गाथा काकडे, समिक्षा शिंदे, मुक्ता महामुनी, समृद्धी साबळे, वेदिका मुतांगे, ख्याती खंबायत, हरडे आणि युवराज डागलिया या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यापैकी बारामती तालुक्यातील निंबुत गावची कन्या गाथा काकडे हिने मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या या सत्कार समारंभात गाथाच्या यशाचा सन्मान करत उपस्थित मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राजेश सप्रा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर मिळविलेल्या या यशाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्चर प्रवेश परीक्षांमध्ये एआयसीटी डिझाईन अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश संस्थेच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पावती ठरले आहे.
