Bhor Breaking l दारूसाठी पैसे न दिल्याने मुलानेच केला आईचा खून; वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर | संतोष म्हस्के
वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी येथे दारूच्या नशेत मुलाने आईच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी घडली. या घटनेत बेबी काळू मालुसरे (वय ५२) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर भोर पोलिसांनी आरोपी मुलगा समीर काळू मालुसरे (वय ३१) याला ताब्यात घेतले.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या समीरने तिच्या डोक्यात आणि तोंडावर लोखंडी रॉडने वार केले. या हल्ल्यात बेबी मालुसरे यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपीने मृत आईचा मृतदेह घरातच ठेवून घराला बाहेरून कुलूप लावले. तसेच शेजाऱ्यांना आई गावाला गेल्याचे सांगितले. काही तासांनंतर आरोपी पुन्हा घराजवळ आला आणि आई घरातच असल्याचे सांगितले. दरम्यान, महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी भोर पोलिसांशी संपर्क साधला.
माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी समीर मालुसरे याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस दत्तात्रय जाधव, विशाल मोरे, दीपक गायकवाड व हेमंत भिलारे करीत आहेत.
To Top