सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : अक्षय इथापे
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कारखान्याच्या खर्चातून दरवर्षी अपघात विमा योजना राबविली आहे. या विमा योजनेअंतर्गत चालू वर्षात अपघाती निधन झालेल्या चार सभासदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
कारखान्याचे सभासद आप्पा कृष्णा शिंदे (माळवाडी-लाटे), दत्तात्रय नाथ्याबा यादव (शिरष्णे), झुंबर निवृत्ती पानसरे (पानसरेवाडी-सुपा) आणि प्रकाश दत्तात्रय तांबे (जेऊर) यांचे अपघाती निधन झाले होते. या सभासदांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ तसेच सुरेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संकटाच्या काळात मयत सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने कारखान्याने राबविलेल्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले.
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या श्री सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे शिक्षण घेणाऱ्या करण शरद भगत (रा. मुर्टी, उंडवडी) याचा सोमेश्वर येथे अपघात झाला होता. त्याच्यावर के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू असताना १६ जुलै २०२६ रोजी त्याचे निधन झाले. करणच्या कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगी सोमेश्वर विद्यालय व करंजे भागशाळेतील शिक्षकवृंद, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी व माणुसकी जपत ‘एक हात मदतीचा’ या भावनेतून ५५ हजार रुपयांची मदत जमा केली.
ही मदत सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करणच्या भावाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी लालासाहेब नलवडे, संचालक, विद्यालयाचे प्राचार्य पी बी जगताप, सचिव भारत खोमणे, तसेच शिक्षक उपस्थित होते.
