सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
देशाच्या विविध भागातील पाच जणांची सायबर फसवणूक करून त्यांची तब्बल ८९ लाख ९४ हजार ७१० रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात घेतल्याप्रकरणी खिंडवाडी, ता. सातारा येथील एका व्यक्तीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर प्रकाश जाधव (वय ३८, रा. खिंडवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यातील हवालदार अतुल तावरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर जाधव याने ‘किसान क्रॉप फर्टीलायझर’ या नावाने साताऱ्यातील एका बँकेत २०२४ मध्ये बँक खाते उघडले होते. या खात्यात देशाच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होत असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले.
त्यानंतर बँकेच्या वतीने या खात्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २०२४ ते २०२६ या कालावधीत देशातील विविध बँक खात्यांमधून ज्ञानेश्वर जाधवच्या खात्यात तब्बल ८९ लाख ९४ हजार ७१० रुपये जमा झाल्याचे समोर आले.
याबाबतचा अहवाल बँकेने सायबर पोलिस ठाण्याकडे सादर केला. पोलिसांनी केलेल्या पडताळणीत जाधवच्या खात्यात जमा झालेली रक्कम सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याचे समोर आले. देशाच्या विविध भागातील पाच व्यक्तींची सायबर फसवणूक करून त्यांच्याकडून रक्कम या खात्यात वळती करण्यात आल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
