सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय, मुढाळे शाखेत शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पंचायत समिती बारामती व एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील विद्यार्थ्यांना एकूण ५२ सायकलींचे वाटप करण्यात आले.
या सायकलींचे वाटप जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप, पंचायत समिती सदस्य वैशाली कोकणे, संस्थेचे सचिव भारत खोमणे आणि पंचायत समिती बारामतीचे माजी सभापती मनोहर वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुढाळे ग्रामपंचायतीचे सरपंच जयपाल साळवे, उपसरपंच लक्ष्मण दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत वाबळे यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी पी. आर. यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यालयासाठी वॉल कंपाऊंड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावर अध्यक्षांनी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, मंगेश जगताप मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अभिजीत वाबळे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय गायकवाड यांनी केले, तर आभार जितेंद्र चव्हाण यांनी मानले. सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
