Milk Price Hike : दूध उत्पादकांसाठी गुड न्युज..! दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महागणार; 'या' तारखेपासून नवीन दर लागू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात दूध ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्यात ११ ऑगस्टपासून गायीच्या आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार गायीच्या दुधाचा दर ६० रुपयांवरून ६२ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा दर ७६ रुपयांवरून ७८ रुपये प्रतिलिटर होणार आहे. याशिवाय विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदीच्या दरात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादन व प्रक्रिया व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत दूध विक्री दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार
नवीन दरानुसार गायीचे दूध ६२ रुपये आणि म्हशीचे दूध ७८ रुपये प्रतिलिटर मिळणार आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याने दूध, दही, पनीर यांसह अन्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटवर होणार आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक झाली. संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाढत्या उत्पादन खर्चाचा आढावा घेण्यात आला.
गेल्या काही काळात डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १० रुपयांची वाढ झाली आहे. साखरेच्या दरातही प्रतिकिलो १२ रुपयांनी वाढ झाली असून पॅकिंग साहित्याच्या खर्चात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच दूध खरेदीचे दर वाढल्याने दूध व्यवसायाचा एकूण खर्च वाढला आहे. त्यामुळे दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांचा दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अॅनालॉग पनीरवरील बंदीच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचे आभार मानण्यात आले.
To Top