Satara Breaking l सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये मुदतबाह्य औषध दिल्याचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये रुग्णाला मुदतबाह्य औषध दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मे २०२६ मध्येच मुदत संपलेली ‘Adivit Total’ नावाची गोळी रुग्णाला देण्यात आल्याचा आरोप बावधन (ता. वाई) येथील कार्तिक हणमंत बागल यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
कार्तिक बागल यांच्या पत्नी सेजल बागल यांना १ ऑगस्ट रोजी दुपारी उपचारासाठी सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना ‘Adivit Total’ नावाची गोळी देण्यात आली. संबंधित गोळीची मुदत मे २०२६ मध्येच संपलेली असल्याचे बागल यांच्या निदर्शनास आले. तसेच गोळीवर बुरशीसदृश थर दिसून आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत कार्तिक बागल यांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. तसेच संबंधित औषधाच्या पॅकवरील तारीख पुसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणी बागल यांनी अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाच्या सहायक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित औषधाची तपासणी करण्यासोबतच रुग्णालयातील औषधांचा साठा, खरेदी, पुरवठा आणि वितरण प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने संबंधित गोळ्या नजरचुकीने देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर रुग्णाकडून गोळ्या परत घेण्यात आल्या असून, डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांची माफी मागितल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या प्रकारामुळे वाई शहरात चर्चेला उधाण आले असून, आता अन्न व औषध प्रशासनाकडून या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी केली जाते का, तसेच औषधाची मुदत, साठा आणि वितरण प्रक्रियेबाबतच्या चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.
To Top