Baramati News | वृक्ष आमचा सखा..! न्यू इंग्लिश स्कूल, मुरूममध्ये अनोखे रक्षाबंधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व भागशाळा मुरूम येथे शनिवारी, २९ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाचा सण एका अनोख्या आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. भावाने बहिणीच्या रक्षणाची शपथ घेण्याच्या पारंपरिक प्रथेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत विद्यार्थिनींनी वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा संकल्प केला.
मुख्याध्यापक मानसिंग जाधव यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. “केवळ नात्यांमध्येच नव्हे, तर निसर्गाशीही आपले रक्षणाचे नाते असायला हवे. वृक्ष आपल्याला ऑक्सिजन, सावली आणि फळे देतात. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच आज आपण वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनाची ग्वाही देत आहोत,” असे विचार मुख्याध्यापक मानसिंग जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थिनींनी शाळेच्या मैदानातील मोठ्या वृक्षांसह आवारात लावलेल्या लहान रोपट्यांना सुंदर राख्या बांधल्या. काही विद्यार्थिनींनी वृक्षांना पाणी घालत त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली. या वेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदासोबत पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे दिसून येत होती.

या उपक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी प्रोत्साहित केले.

या अभिनव रक्षाबंधन उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण झाली असून, समाजातही वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
To Top