Bhor Breaking l भोंगवलीत १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; पुजारी, पालकांसह ७ जणांविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
भोर तालुक्यातील भोंगवली येथील दत्त मंदिरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शैला गंगाराम आटोळे (ग्रामपंचायत अधिकारी पवार वाडी ता. इंदापूर, रा. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलीचे आई-वडील, वर, वराचे आई-वडील, विवाहासाठी मदत करणारी व्यक्ती आणि विवाह लावणाऱ्या पुजाऱ्यासह एकूण ७ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील उदमाईवाडी येथील १६ वर्षीय सोनाली संतोष घाडगे हिचा विवाह १२ मे २०२६ रोजी दुपारी भोंगवली येथील दत्त मंदिरात ऋषभ बबन कुरूमकर (रा. वांगदरी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) याच्याशी लावण्यात आला.
 मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचा विवाह घडवून आणल्याचा आरोप असून, या विवाहात संबंधितांनी सहभाग घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे वडील संतोष बबन घाडगे, आई रूपाली संतोष घाडगे, वर ऋषभ बबन कुरूमकर, वराचे वडील बबन दौलता कुरूमकर, आई सीमा बबन कुरूमकर, तसेच निलेश शिवाजी घाडगे आणि विवाह लावणाऱ्या अज्ञात पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.
To Top