बारामती l सोमेश्वर कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा मुद्दा तापणार ? टनाला ५ हजार भाव द्या; शिवसेनेचे मागणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : अक्षय इथापे 
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रणधुमाळीत आता उसाच्या दराचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शेतकऱ्यांच्या उसाच्या दराचा मुद्दा लावून धरला आहे. शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष हनुमंत भापकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाला अधिकृत पत्र देऊन उसाला प्रति टन ५,००० रुपये भाव देण्याची जाहीर मागणी केली आहे.
सध्या खुल्या बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचा दावा शिवसेना उ.बा.ठा.च्या वतीने करण्यात आला आहे. खुल्या बाजारात साखरेचे भाव प्रति क्विंटल ६,००० ते ७,००० रुपयांच्या घरात गेल्याने साखरेच्या बाजारभावात मोठी तेजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना उसाला अधिक दर देणे अपेक्षित असल्याचे शिष्टमंडळाने म्हटले आहे.

मात्र, कारखान्याने सध्या जाहीर केलेला उसाचा ४,००० रुपये प्रति टन भाव बाजारातील वाढत्या तेजीच्या तुलनेत अपुरा आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. साखरेचे बाजारभाव वाढत असताना त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना उ.बा.ठा.च्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
वाढत्या बाजारभावाची सरासरी काढून शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्यासाठी यंदाच्या गळीत हंगामात उसाला किमान ५,००० रुपये प्रति टन भाव मिळावा, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष हनुमंत भापकर यांनी केली आहे. या संदर्भात कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाला अधिकृत पत्र देण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दरवाढीचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उसाच्या दराचा मुद्दा केंद्रस्थानी येत असल्याने आगामी काळात हा विषय अधिक गाजण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या निवडणुकीत विविध मुद्द्यांवर राजकीय हालचालींना वेग आला असून, उसाच्या दरावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वेळी शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष हनुमंत भापकर यांच्यासह अमित सोरटे, निलेश जगताप, संदिप फरांदे, वासुदेव दळवी, संकेत जगताप, सोपान कुदळे, दत्तात्रय भोसले आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top