सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर येथील कै. शुभांगद गोरेगावकर स्मृती रुग्णालयाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सुरेश गोरेगावकर यांच्या वयाची ७५ वर्षे आणि रुग्णसेवेची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी भोर-मांढरदेवी मार्गावरील यशवंत लॉन्स सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. गोरेगावकर यांची ग्रंथतुला करण्यात येणार असून जमा होणारी पुस्तके व ग्रंथ शाळा-महाविद्यालयांना मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय विविध शाळांना ७५ देशी, औषधी आणि फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच डॉ. गोरेगावकर यांच्या कार्यावर आधारित ‘द मॅन विथ सोशल स्टेथोस्कोप’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल आणि भोरचे राजे राजेशराजे पंतसचिव यांच्या हस्ते डॉ. सुरेश गोरेगावकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. गोरेगावकर यांना फुले पगडी, घोंगडी, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती गौरव समितीचे अध्यक्ष प्रा. विजय जाधव, गौरव ग्रंथाचे संपादक संतोष ढवळे, सहसंपादक संतोष दळवी, निमंत्रक डॉ. रोहिदास जाधव, प्रा. ज्ञानोबा घोणे आणि डॉ. अमर भोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
