सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील काशीळ गावच्या हद्दीत ग्रामीण रुग्णालयासमोर कराड-सातारा मार्गावरील लेनवर दुचाकी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात अमीर हुसेन सनमानी (वय २६, रा. इब्राहिमपूर, ता. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक) या युवकाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र अरबाज शहा (वय २३) गंभीर जखमी झाला आहे.
अमीर सनमानी हा मित्र अरबाज शहासोबत दुचाकीवरून कर्नाटकहून मुंबईच्या दिशेने जात होता. काशीळ गावच्या हद्दीत दुचाकी आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट दुभाजकाला धडकली. या अपघातात अमीर याला गंभीर दुखापत झाली. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अरबाज शहा याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक सुधीर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हवालदार अमोल गवळी व संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची माहिती घेतली.
या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.
