Indapur Crime l कॅरेटच्या आडून गुटख्याची वाहतूक; इंदापूर पोलिसांची कारवाई..! २३ लाखांचा गुटखा जप्त; चालक अटकेत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर : संतोष माने 
 प्रतिबंधित गुटख्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर इंदापूर पोलिसांनी कारवाई करत १५ लाख ८७ हजार ६४० रुपयांचा विमल गुटखा आणि ८ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण २३ लाख ८७ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक आजमखान महमूद पठाण (रा. सरस्वतीनगर, इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे.
२० ऑगस्ट रोजी मध्यरात्री सहायक फौजदार प्रकाश माने यांना पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हायवे मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. बावड्याकडून येणाऱ्या एमएच ४२ BU १०२९ क्रमांकाच्या पिकअप वाहनावर संशय आल्याने पोलिसांनी ते थांबवून तपासणी केली.
वाहनाच्या हौद्यात मागील बाजूस रिकामे कॅरेट लावलेले आढळले. त्यांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विमल गुटख्याचा साठा आढळून आला. तपासात हा गुटखा कर्नाटकातील तिकोटा येथून कमलेश नामक व्यक्तीकडून विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली.
कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे व पोलिस कॉन्स्टेबल हसीम मुलाणी करीत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चेतन्य कदम आणि पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांच्या पथकाने केली.
To Top