सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात माय-लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मयतांमध्ये रमा विजय गावडे (वय ४१) आणि त्यांचा मुलगा विवेक विजय गावडे (वय १७) यांचा समावेश आहे. विवेकचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, तर रमा गावडे यांच्या गळ्यावर काळसर व्रण आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विजय गावडे हे २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या पाळीसाठी जी.टी.एन. कंपनीत कामावर गेले होते. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पत्नी आणि मुलाला आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या सुरज शिंदे यांना बोलावले. दोघांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विवेक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, तर त्याच खोलीतील खिडकीजवळ रमा गावडे बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.
दोघांनाही तातडीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही सकाळी ११ वाजण्यापूर्वी मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर काळे करीत आहेत.
