सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिक्रापूर : प्रतिनिधी
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर प्रवाशाला रिक्षात बसवून निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या रिक्षाचालकासह दोघांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सणसवाडी परिसरात ८ ऑगस्टच्या सायंकाळी ही घटना घडली. अंतर्यामी सुरेंदर दास कुमार (वय २२, रा. शिक्रापूर) हे रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. आरोपींनी त्यांच्या गळ्यावर व हातावर वार करून सोन्याचे लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडिताने धैर्याने प्रतिकार केल्याने आरोपींनी त्यांचा ओपो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. जीव वाचवण्यासाठी अंतर्यामी यांनी चालू रिक्षेतून उडी मारली, तर आरोपी रिक्षेसह पसार झाले.
घटनेनंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे सापळा रचून हर्षवर्धन उर्फ अजय अशोक फाजगे (वय २६) आणि राहुल दिलीप फाजगे (वय २०) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी रविंद्र भोसले आणि निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जितेंद्र पानसरे, दामोदर होळकर, अमोल दांडगे, रोहीदास पारखे, नारायण वाळके यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
रिक्षात बसवून प्रवाशांना निर्जन ठिकाणी लुटण्याच्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपींना जेरबंद करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
