Khandala Crime l घरफोडी, जबरी चोरीतील आरोपींसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त ; शिरवळ पोलिसांची कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
खंडाळा : प्रतिनिधी
शिरवळ येथील दत्तनगरमध्ये बंद घर फोडून चोरी करणाऱ्या व फुलमळा परिसरात पादचाऱ्याला मारहाण करून मोबाईल चोरणाऱ्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयीतांचा शिरवळ पोलिसांनी पर्दाफाश करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन दुचाकींसह तीन लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

12 ऑगस्ट रोजी शिरवळ येथील दत्तनगरमध्ये असणाऱ्या एक बंद घराची कडी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून दोन लाख दहा हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता तर दुसऱ्या घटनेमध्ये जेवण करून रूमवर निघालेल्या पादचारी युवकाला फुलमळा परिसरामध्ये बेदम मारहाण करत त्याचा मोबाईल चोरी झाला होता. 

या चोरीबाबत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अतिशय कौशल्यपूर्ण तपास करत दत्तनगर येथील बंद घर चोरीप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत एक सराईत गुन्हेगार साहिल विजय कोळी (वय 21, शिरवळ, ता. खंडाळा) याला जेरबंद केले.
दुसऱ्या घटनेमध्ये पायी चालत जाणाऱ्या युवकाला मारहाण करत त्याचा मोबाईल लुटणाऱ्या घटनेमध्ये चार जण असल्याचे सीसीटीव्ही मध्ये निष्पन्न झाले.

 याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले तर अनिरुध्द सुमित गायकवाड (वय 25, रा.भोळी ता.खंडाळा) व आर्यन जीवन जाधव (वय 24, रा. शिरवळ ता.खंडाळा) या दोन युवकांना जेरबंद केले आहे. 
दोन्ही गुन्ह्यातील तिघांना खंडाळा न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने सोमवारी (दि24) पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ,पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार,पोलीस अंमलदार दत्तात्रय धायगुडे, सचिन वीर, प्रशांत धुमाळ, सुरज चव्हाण, अक्षय नेवसे, अक्षय बगाड, काजल शिंगटे यांच्याद्वारे ही कारवाई करण्यात आली.
To Top