बारामती l पारंपरिक शेतीला ड्रॅगन फ्रूट शेतीची जोड देत चार एकरात यशस्वी प्रयोग; वर्षाला ५ ते ६ लाखांचे उत्पन्न

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बदलत्या काळानुसार पारंपरिक शेतीला आधुनिक व नाविन्यपूर्ण पिकांची जोड देत आर्थिक प्रगती साधता येते, याचे उत्तम उदाहरण वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील प्रगतशील शेतकरी विलास सिताराम बनकर यांनी घालून दिले आहे. त्यांनी चार एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड करून शेतीतून उत्पन्नाचा नवा मार्ग निर्माण केला आहे.
बनकर यांनी २०१९ च्या अखेरीस ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला सुमारे दीड लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी चार एकर क्षेत्रात या पिकाची लागवड केली. मात्र, नवीन पिकाचा प्रयोग असल्याने सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अपेक्षित सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत नसतानाही त्यांनी हार न मानता आपल्या प्रयोगावर विश्वास ठेवला.
योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि पीक व्यवस्थापनाच्या जोरावर अवघ्या सहा महिन्यांत त्यांच्या शेतात ड्रॅगन फ्रूटची फळधारणा सुरू झाली. त्यानंतर उत्पादनात सातत्य राखत त्यांनी या शेतीत चांगले यश मिळविले असून सध्या ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनातून त्यांना सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
नवीन पिकाचा प्रयोग करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून मिळविलेले हे यश परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. याबाबत विलास बनकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत नवीन पिके आणि आधुनिक शेती पद्धतींचे प्रयोग करण्यास घाबरू नये. योग्य नियोजन, सातत्य आणि मेहनत ठेवली तर शेतीतून निश्चितच चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.

ही यशोगाथा डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर, बारामती येथील कृषिकन्यांनी RAWE (Rural Agricultural Work Experience) कार्यक्रमांतर्गत EXTN विषयासाठी संकलित केली आहे.
To Top