Purandar Crime | कोळविहिरे येथे भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८५ हजारांचे दागिने लंपास

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे 
जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कोळविहिरे येथील गाठी मळा परिसरात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावरील पत्र्याचे पान उचकटून घरात प्रवेश करत तब्बल ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नानासो हरिभाऊ घाटे यांच्या घरातील सर्वजण दिवसभर शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी काम आटोपून घरी परतल्यानंतर घराच्या छतावरील पत्रा उचकटलेला दिसून आला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उचकटून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
कपाटातील सोन्याचे गंठण, राणीहार, अंगठी आणि कानातील फुले असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळून आले.
या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, जेजुरी पोलीस पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे कोळविहिरे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
To Top