बारामती l रीलच्या नादात ‘भाईगिरी’ दाखवणे पडले महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपा : प्रतिनिधी 
 सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी हत्यारांचे प्रदर्शन करीत रील बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवर पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक व धमकीवजा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सुपा पोलीस ठाण्याचे सायबर मॉनिटरिंग पथक सोशल मीडियावर गस्त घालत असताना २४ ऑगस्ट रोजी ‘prem_jagtap_0295’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रसारित झालेला व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आला. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी (ता. बारामती) येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन व्हिडिओ तयार केल्याचे आढळून आले.
व्हिडिओवर ‘आलीशान युवा प्रतिष्ठान’ असा मजकूर तसेच ‘शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है’ अशा प्रक्षोभक व धमकीवजा वाक्यांचा वापर करण्यात आला होता. तसेच ऑडिओमधून हल्ल्याचा संदर्भ देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली. आरोपी प्रेम जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार रुपेश साळुंके, पोलीस शिपाई किसन ताडगे, महादेव साळुंके आणि भाऊसाहेब चौधरी यांचा समावेश होता.

रीलसाठी ‘रिअल’ आयुष्य धोक्यात घालू नका!
सोशल मीडियावर हत्यारांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची २४ तास करडी नजर असून, अशा प्रकारांमध्ये कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे. तरुणांनी सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी कायद्याचे उल्लंघन करून स्वतःचे भविष्य धोक्यात घालू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
To Top