सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुप्याच्या जिरायती पट्टयात पुरेसा पाऊस नसल्याने, परिसरातील पाझर तलाव अद्यापही कोरडे आहेत. त्यामुळे शासनाने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे सुप्यासह परिसरातील वाड्यावस्त्यांचे पाझर तलाव भरण्याची मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे.
सद्या धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे पुण्याकडुन येणाऱ्या कालव्याद्वारे तसेच नद्याद्वारे धरणातुन मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी व कालव्याद्वारे वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी वरवंड तलावात सोडण्याची मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे. त्यामुळे जनाई योजना कार्यान्वित होण्यास मदत होईल.
त्यानंतर जनाई योजनेद्वारे जिरायती पट्टयातील पाझर तलाव भरण्यात यावे. येथील पाझर तलाव भरल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच खरिप हंगामातील उभ्या पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे वरवंड तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान याबाबत शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, दोन दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता देशमुख आदींना कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पत्र दिले आहे. त्यांनी येत्या १८ ऑगस्ट पर्यंत पाणी सोडण्याबाबत आश्वासन दिले आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यास सुपे येथील चौफुला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा खैरे यांनी दिला आहे.
