Bhor News l २७ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला यश; परहर खुर्दच्या धरणग्रस्तांना प्रति हेक्टर ३.१३ लाख वाढीव नुकसान भरपाई

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
निरा देवघर धरण प्रकल्पासाठी सन १९९९ मध्ये मौजे परहर खुर्द (ता. भोर) येथील संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी तब्बल २७ वर्षे सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश आले असून, उच्च न्यायालयाने धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल देत प्रति हेक्टर ३ लाख १३ हजार रुपये वाढीव नुकसानभरपाई मंजूर केली आहे.
धरणासाठी जमीन संपादित करताना भूमी संपादन अधिकाऱ्यांनी दिलेला मोबदला अत्यल्प असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांनी वाढीव नुकसानभरपाईसाठी जिल्हा न्यायालयात दावे दाखल केले होते. या दाव्यांवर सुनावणी करत जिल्हा न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत नुकसानभरपाईत वाढ केली.
मात्र, अधिक नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. दुसरीकडे, जिल्हा न्यायालयाने वाढीव नुकसानभरपाई मंजूर केल्याच्या निर्णयाविरोधात भूमी संपादन मंडळानेही उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची अपील आणि भूमी संपादन मंडळाची अपील एकत्रितपणे ऐकून दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद विचारात घेतला. यामध्ये धरणग्रस्त शेतकऱ्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने मोठा दिलासा देणारा निकाल दिला. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने मंजूर केलेल्या रकमेपेक्षाही लक्षणीय वाढ करत प्रति हेक्टर ३ लाख १३ हजार रुपये वाढीव नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली.

या संपूर्ण न्यायालयीन लढ्यात ॲड. पल्लवी पोतनीस व ॲड. गौरव पोतनीस यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मांडली. तसेच या लढ्यासाठी माजी सरपंच संजय साने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सातत्याने एकजूट कायम ठेवली.

निकाल जाहीर झाल्यानंतर ॲड. पल्लवी पोतनीस यांच्या कार्यालयात धरणग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. न्यायासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या सर्वांच्या चिकाटीचे फळ मिळाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
Tags
To Top