Jawali News l मेढा-भिलार घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मेढा : सोमनाथ साखरे 
मेढा–मार्ली मार्गे भिलारकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावर बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण दरड कोसळल्याची घटना घडली. डोंगराचा मोठा कडा आणि मातीचा प्रचंड ढिगारा थेट रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, दरड इतकी मोठी आहे की रस्त्यावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक शक्य नसल्याने मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
महाबळेश्वर आणि जावली या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा हा सर्वात जवळचा आणि सोयीचा घाटमार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज स्थानिक ग्रामस्थ, चाकरमाने तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. मात्र, दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचून ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना या मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबी आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पाठवून दरड हटविण्याचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्ता लवकरात लवकर सुरक्षित करून वाहतूक पूर्ववत करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
To Top