सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' बोगद्यात आज (दि. ७) मध्यरात्री सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील युवा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य तीन ते चार जण जखमी झाले असून, त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे आपल्या फॉर्च्युनर वाहनातून पुण्याहून मुंबईकडे जात होते. 'मिसिंग लिंक' बोगद्यातून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाने समोरून जात असलेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्यांपैकी एका व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, उर्वरित जखमींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.
तुषार भूमकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे 'मिसिंग लिंक' बोगद्यात काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
तुषार भूमकर हे वाकड व पिंपरी-चिंचवड परिसरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या पत्नीने यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून महापालिका निवडणूक लढवली होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे वाकड परिसरात शोककळा पसरली असून, विविध राजकीय, सामाजिक व नागरिक स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
