सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
खोपवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, खोपवाडीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक आज (दि. १४ ऑगस्ट) सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बारामती यांच्या कार्यालयात पार पडली. संस्थेचे पहिले चेअरमन भानदास ज्ञानदेव चांदगुडे व व्हाईस चेअरमन कुसुम मारुती जगताप यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवड प्रक्रिया घेण्यात आली.
संस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी ज्ञानदेव सर्जेराव चांदगुडे, तर व्हाईस चेअरमनपदी गणेश निवृत्ती चांदगुडे यांची बिनविरोध विरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद दुरगुडे यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव संजय जाधव व सहसचिव विठ्ठल गोसावी यांनी सहकार्य केले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
खोपवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सभासद संख्या ४१५ असून संस्थेचे भागभांडवल ५० लाख ९० हजार रुपये आहे. संस्थेने आतापर्यंत ४ कोटी २१ लाख ५७ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले असून संस्थेची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ५ कोटी ७० लाख रुपये आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या संचालक मंडळ, सभासद व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या प्रगतीला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
