Baramati News l सोमेश्वर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांची मदत; ८३ गणवेशांचे वाटप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : सोमेश्वरनगर
सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर येथील एस.एस.सी. १९९०च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ८३ गणवेशांचे वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार स्वाती गायकवाड होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी, “स्वप्न पहा, त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि स्वप्न प्रत्यक्षात जगा,” असा प्रेरणादायी संदेश दिला. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी विद्यार्थी सुनील घाडगे यांनी शाळेप्रती असलेले प्रेम, बांधिलकी आणि जिव्हाळा यामधूनच हा उपक्रम राबविण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. तसेच सुभेदार मेजर सुरेश भानुदास कांबळे आणि दिग्विजय कैलास मगर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास माजी विद्यार्थी दादा गायकवाड, बापूकाका भांडवलकर, राजेंद्र काळे, संगीता गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद जगताप, उपप्राचार्य शरद जगदाळे, पर्यवेक्षक गोरक्षनाथ इंगळे, संदीप कदम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र झुरंगे यांनी केले. योगेश महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

माजी विद्यार्थ्यांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात मोठी मदत मिळाली असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळाले आहे.
To Top