Pune News l चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर 
पुणे : प्रतिनिधी
चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी तसेच अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. यासंदर्भात चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चाकण नागरी कृती समिती तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना
चाकण एमआयडीसीतील प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे तसेच चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना याबाबत निर्देश देण्यात आले.
चाकण एमआयडीसी हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा औद्योगिक परिसर असून, येथे मोठ्या संख्येने उद्योग आणि कामगार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचा उद्योग क्षेत्रावरही परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांना विश्वासात घेऊन समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयाने काम करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
Tags
To Top