बारामती l 'सोमेश्वर'चा ऊस दरात राज्यात डंका : गतवर्षीच्या उसाला अनुदानसह ४ हजार रुपयांचा अंतिम दर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला ३८०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. फेब्रुवारीत तुटलेल्या उसाला अनुदानसह ३९०० रुपये तर मार्चमध्ये तुटलेल्या उसाला ४ हजार रुपये अंतिम दर बसला आहे. 
हा दर राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. 
 आज दि. १४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये तुटणाऱ्या ऊसास टनाला ३,८०० रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास टनाला ३,९०० रुपये व मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास टनाला ४ हजार रुपये एवढा सर्वोच्च असा ऊसदर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाहिर केल्याची माहिती जगताप यांनी दिली. संपुर्ण राज्यात एफ.आर.पी. पेक्षा टनाला ५१५ रुपये जास्त ऊसदर देणारा श्री सोमेश्वर कारखाना राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे. मागील गाळप हंगाम २०२५-२०२६ मध्ये कारखान्याने एकूण १२,९८,५५९.३५७ मे. टनाचे गाळप केले असून बी हेवीसह सरासरी १२.२७ टक्के साखर उतारा राखीत १५,५७,६५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून १२,५३,४४,६८० युनिट्सची वीजनिर्मिती केली असून ८,३६,७०,४८० युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून ८६,२५,००१ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत ४३,८२,५६९ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. आपल्या सोमेश्वर कारखान्याची सन २०२५-२६ हंगामाची टनाला ३,२८५ रुपये एफ.आर.पी. होती त्यावर कारखान्याने आजअखेर टनाला ३,३०० रुपयांची रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली होती. उर्वरीत रक्कम ही दिवाळीपुर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडाळाच्या बैठकीमध्ये घेणेत आलेला आहे.

येणाऱ्या गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये माहे फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास टनाला १०० रुपये मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास टनाला २०० तर एप्रिल व त्यानंतर तुटणाऱ्या ऊसास टनाला ३०० रुपये अनुदान देणेत येणार आहे. तसेच येणाऱ्या हंगामामध्ये हार्वेस्टरद्वारे तुटणाऱ्या ऊसास टनाला ५० रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देणेत येणार असून, १५ फेब्रुवारीनंतर तुटुन राखलेला खोडवा जो गाळपास येणार आहे त्यास टनाला १०० रुपये प्रमाणे अनुदान देणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

       लोकनेते स्वर्गीय अजित पवार यांनी काटकसरीने, शिस्तीने व ध्येयधोरणानुसार कारखाना चालविणेसाठी जे अनमोल मार्गदर्शन यापुर्वी कायम केले होते त्याच धर्तीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे देखिल काटकसरीने व शिस्तप्रिय ध्येयधोरणानुसार कामकाज करण्याचे मार्गदर्शन नेहमीच संचालक मंडळाला लाभत आलेले आहें. त्याचप्रमाणे संचालक मंडळाचे देखिल या बहुमोल मार्गदर्शनास अनुसरुन सुरु असलेले काटकसरीय व उत्तम नियोजनपुर्व कारभार यामुळे आपला सोमेश्वर सर्वोच्च ऊसदराची परंपरा गेली अनेक वर्ष निर्विवाद कायम राखू शकला याचा आम्हा संचालक मंडळास अभिमान आहे. कारखान्याच्या सर्वोच्च ऊसदर देण्याच्या पंरपरेसोबतच संचालक मंडळाने कारखान्याची विस्तारवाढ, को-जनरेशनची विस्तारवाढ पुर्ण केलेली असून गाळप हंगाम २०२६-२७ हंगामाबरोबर डिस्टीलरी सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. कारखान्याचे सभासद, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी वाहतूकदार कामगार यांच्या सहकार्यामुळेच सोमेश्वरची घौडदौड यशस्वीरित्या सुरु असून यापुढील काळातही आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष किसन तांबे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, मिलिंद कांबळे, ऋषि गायकवाड, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, प्रणिता खोमणे, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, तुषार माहुरकर, सचिव कालिदास निकम यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
To Top