राजगड l पोलिसांचा सापळा अन् चोरट्यांची धावपळ! एकाला अटक, दोघे डोंगराच्या दिशेने फरार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे 
राजगड तालुक्यातील घेवंडे येथील सुरज ननवरे यांच्या फॉर्महाऊसचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रविवार (दि. ९ ऑगस्ट) रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८८ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध घरफोडीसह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) पोलीस हवालदार गजानन खत्री यांना चोरटे पुन्हा चोरीच्या उद्देशाने घेवंडे परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घेवंडे गावात गस्त वाढविली.
दरम्यान, फॉर्महाऊसजवळ एक पिकअप टेम्पो संशयास्पदरीत्या दोन-तीन वेळा फेऱ्या मारत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. टेम्पोच्या चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले असता चालकाने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पिकअप टेम्पो अडवून चालक रमेश बबन मरगळे याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेले दोन संशयित मात्र डोंगराच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, फरार झालेल्या दोन संशयितांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी आणि वेल्हे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस हवालदार गजानन खत्री, सोमेश राऊत, पोलीस अंमलदार युवराज सोमवंशी, बुद्धीवान मोरे, अजिंक्य बंडगर, आकाश पाटील, मयूर जगताप, अजय गार्डी, शुभम कदम व सोमनाथ जाधव यांच्या पथकाने केली.
To Top