Pune-Satara Highway News l शिरवळ अपघातांचे ‘हॉटस्पॉट’; आठवड्यातील तिसरा भीषण अपघात, कारचा चक्काचूर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
शिरवळ : प्रतिनिधी 
पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) हद्दीत अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला. भरधाव कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, MH 11 DU 7303 क्रमांकाची कार पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. शिरवळ गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर महामार्गावरील वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. कारमधील एअरबॅग्ज वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आठवड्यातील तिसरा मोठा अपघात
गेल्या आठवडाभरात शिरवळ परिसरात झालेला हा तिसरा मोठा अपघात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पुण्यातील कात्रज-देहूरोड बायपासवरील नवळे पुलाप्रमाणे शिरवळ परिसरही अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ बनत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महामार्गावरील काही ठिकाणची वळणे, अपुऱ्या सूचना फलकांची व्यवस्था, वाहनांचा वेग आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे अपघात वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
शिरवळ हद्दीत वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेऊन महामार्ग प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अपघातप्रवण ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, वेग नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.
To Top