सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोलापूर : प्रतिनिधी
सांगली आणि सातारा जिल्ह्यांत १९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी का घालत आहेत, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या तथा जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी केला. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जयकुमार गोरे यांच्या कथित भ्रष्ट कारभारावर गंभीर आरोप करत विविध कागदपत्रे आणि पुरावे प्रसारमाध्यमांसमोर मांडले.
कोरोना काळात मायणी येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये वैद्यकीय गैरव्यवहार झाल्याचा आरोप अंधारे यांनी केला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा गैरवापर करून २०० हून अधिक रुग्णांची बोगस बिले तयार करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. मृत व्यक्तींना कागदोपत्री जिवंत दाखवून त्यांच्या नावावर उपचार केल्याचे दाखवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. बिरोबा तात्या खर्जे या रुग्णाचा २९ जून २०२१ रोजी मृत्यू झाला असतानाही त्यांना ८ जुलैपर्यंत रुग्णालयात दाखल असल्याचे दाखवून १८ जुलैला डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आल्याचे अंधारे यांनी सांगितले. मृतांच्या नावावर बनावट सह्या आणि वैद्यकीय अहवाल जोडून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत त्यांनी ३५ हून अधिक मृत व्यक्तींची यादीही सादर केली.
या प्रकरणात वडूज पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने संबंधितांशी संगनमत करून जयकुमार गोरे यांचे नाव गुन्ह्यातून वगळल्याचा गंभीर आरोपही अंधारे यांनी केला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या प्रकरणात संबंधितांविरोधात समन्स बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय एका महिलेचे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरणासह विविध गुन्ह्यांचा उल्लेख करत अंधारे यांनी गोरेंवर टीका केली. एका बँक खात्यात जमा झालेल्या एक कोटी रुपयांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच दलित व्यक्तीची शेतजमीन बळकावल्याप्रकरणी ६ मार्च २०२५ रोजी गोरेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचा आणि त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याचा दावा त्यांनी केला. दहीवडी, मिरज, ईश्वरपूर आणि सातारा शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जयकुमार गोरे यांच्यावर १९ गुन्हे दाखल असल्याचे सांगत, ‘त्यांच्यावर मोक्काची फाईल तयार होती, म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का?’ असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.
शासकीय विश्रामगृहातील आलिशान सूट्सवर जनतेच्या करातील सुमारे १० कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याचा आरोप करत या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. जयकुमार गोरे यांनी या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंधारे यांनी केली. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अंधारे यांनी टीका केली. ‘देवेंद्र फडणवीस कधी एकदा दिल्लीत जातील आणि मी राज्याचा मुख्यमंत्री होईन,’ अशा अविर्भावात बावनकुळे वागत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शरणराज केंगनाळकर, दत्ता माने, प्रवीण काकडे, महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, संजय पोळ, महिला जिल्हा संघटक मंगल थोरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
