सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
साप्ताहिक ‘सोमेश्वर रिपोर्टर’च्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विद्यार्थी विचारमंथन स्पर्धा – २०२६’ मधील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, विचारशक्ती आणि विविध सामाजिक विषयांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोपणे प्रमुख उपस्थित होते. तसेच वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, पत्रकार संतोष शेंडकर, गणेश आळंदीकर, महेश जगताप, अक्षय इथापे आणि प्राचार्य पी. बी. जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर येथे झालेल्या विद्यार्थी विचारमंथन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक शौफिन संदिप गाडे (इयत्ता ७ वी), द्वितीय क्रमांक राजनंदिनी नवनाथ कुंडलकर (इयत्ता ६ वी) आणि तृतीय क्रमांक ओम दयानंद रासकर (इयत्ता ५ वी) यांनी मिळविला. तसेच मनस्वी सोमनाथ कोळपे (इयत्ता ७ वी), ओमराज अशोक खेंगरे (इयत्ता ६ वी) आणि शुभ्रा भारत शिंदे (इयत्ता ७ वी) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
तसेच विद्या प्रतिष्ठान, वाघळवाडी येथेही विद्यार्थी विचारमंथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा तानाजी महानवर (इयत्ता ६ वी), द्वितीय क्रमांक राजेश्वरी हेमंत काळे (इयत्ता ७ वी) आणि तृतीय क्रमांक सई गोरखनाथ दगडे (इयत्ता ७ वी) यांनी पटकावला. तर कोस्तुभी किरण भोसले (इयत्ता ७ वी) आणि ईशा जीवन चव्हाण (इयत्ता ७ वी) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याने दोन्ही ठिकाणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी पत्रकार संतोष शेंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी, विविध विषयांचा अभ्यास करून स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि विविध सामाजिक विषयांवर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक अशोक डोंबाळे यांनी केले. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
विद्यार्थी विचारमंथन स्पर्धेतील सर्व विजेते, सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘विद्यार्थी विचारमंथन स्पर्धा – २०२६’ यशस्वी ठरली. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
