राजगड l अंत्रोलीत दिवसाढवळ्या घरफोडी; सोन्याचे मंगळसूत्र व ५० हजारांची रोकड लंपास..!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील अंत्रोली येथे अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरातील ट्रँकचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करत सोन्याचे मंगळसूत्र व ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून वेल्हे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्रोली येथील रहिवासी वैशाली दिलीप कातुर्डे या गृहिणी असून आपल्या कुटुंब समवेत अंत्रोली येथे राहतात. बुधवारी (५ ऑगस्ट) रोजी घरातील सर्वजण कामानिमित्त घराबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्याचे मंगळसूत्र व ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
कातुर्डे सायंकाळी ६.०० वा दरम्यान घरी परतल्यानंतर घरातील ट्रंकची कडी तोडून झाकण उघडे असल्याचे दिसले. घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर वैशाली कातुर्डे यांनी तात्काळ वेल्हे पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची फिर्याद दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस हवालदार ज्ञानदीप धिवर अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, गावात दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
To Top