सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील सुप्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे यांच्या ‘आडतास’ या काव्यसंग्रहाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुपेसह बारामतीच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमातील ‘साहित्यनिर्मिती प्रक्रिया, साहित्यनिर्मितीचे सिद्धांत-व्यवहार आणि स्वरूप’ या अभ्यासघटकासाठी ‘आडतास’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या काव्यसंग्रहातील ‘लेक’ या कवितेचा यापूर्वीच एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
हनुमंत चांदगुडे यांच्या साहित्याची यापूर्वीही विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांनी दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात त्यांची ‘आळाशी’ ही कविता अभ्यासक्रमात आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या ‘किणकीण घुंगुराची’ या कवितेचा समावेश आहे.
शेती, माती, निसर्ग तसेच आजूबाजूच्या सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण चांदगुडे आपल्या लेखणीतून करतात. विशेषतः शेतकरी, कष्टकरी, दबल्या-पिचलेल्या सामान्य माणसांचा आणि उपेक्षित घटकांचा आवाज त्यांच्या लोकलयीतील कवितेतून प्रभावीपणे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या कवितेतील ग्रामीण बोली, लोकजीवन आणि सामाजिक वास्तव यामुळे त्यांच्या साहित्याला वेगळी ओळख मिळाली आहे.
तसेच अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजसाठी गीतलेखन करणाऱ्या हनुमंत चांदगुडे यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, “याआधीही माझ्या कविता अभ्यासक्रमात आहेत; मात्र आता माझा संपूर्ण काव्यसंग्रह अभ्यासक्रमात येत आहे, याचा आनंद मोठा आहे. या काव्यसंग्रहाचा कवी मी असलो, तरी हा सन्मान माझ्या भागातील कष्टकरी शेतकरी, सर्वसामान्य माणूस आणि त्यांच्या लोकलयीतील भाषेचा सन्मान आहे.”
‘आडतास’ या काव्यसंग्रहाला यापूर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात त्याचा समावेश झाल्याने चांदगुडे यांच्या साहित्यिक कार्याला आणखी एक महत्त्वपूर्ण मान्यता मिळाली आहे.
