Pune-Satara Accident | शिरवळजवळ भीषण अपघात; कार दुभाजक ओलांडून आयशर ट्रकवर आदळली, मावळच्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरवळ : प्रतिनिधी 
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगातील टाटा नेक्सॉन कारचा ताबा सुटून ती दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकला जोरदार धडकली. या भीषण अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे सुमारे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील सहा तरुण टाटा नेक्सॉन कारने साताऱ्याच्या दिशेने जात होते. शिरवळ परिसरात आल्यानंतर कार चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. भरधाव वेगातील कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर जाऊन आदळली.
धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलीस आणि शिरवळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अपघाताच्या कारणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, एकाच परिसरातील चार तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरात शोककळा पसरली आहे.

To Top