Pune Grand Tour | पुणे शहर व जिल्ह्यात ४१३ किमीचे नवीन रस्ते; ३४८ किमी रस्त्यांवर नव्याने काम, ६२७ कोटींचा खर्च

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. शहर व जिल्ह्यात तब्बल ४१३ किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते तयार करण्यात येणार असून, ३४८ किलोमीटर लांबीच्या विद्यमान रस्त्यांवर नव्याने काम करण्यात येणार आहे. या संपूर्ण कामासाठी सुमारे ६२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुण्यात होणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांचा कायापालट केला जाणार आहे. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार रस्ते तयार करण्यात येणार असल्याने सायकलपटूंना दर्जेदार मार्ग उपलब्ध होणार आहेत. मात्र, या कामाचा फायदा केवळ सायकल स्पर्धेपुरता मर्यादित न राहता पुणे शहर आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेलाही होणार आहे.

पाच टप्प्यांत रस्ते विकासाची योजना
यंदाची पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा सहा टप्प्यांत पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते विकासाची कामे पाच टप्प्यांत करण्याची योजना आखली आहे. संबंधित मार्गांवर सध्या प्राथमिक स्वरूपातील माती टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामाला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून, संबंधित कंत्राटदारांना ही कामे १०० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये होणाऱ्या सायकल स्पर्धेपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.
पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळांना मिळणार जोडणी
या रस्ते विकासाचा मोठा फायदा पुणे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रालाही होणार आहे. रस्त्यांच्या माध्यमातून विविध किल्ले, धरणे, पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे जोडली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना या ठिकाणी जाणे अधिक सुलभ होणार आहे. ग्रामीण भागातील खराब किंवा अपुऱ्या रस्त्यांमुळे होणाऱ्या वाहतूक अडचणी कमी होण्यास मदत होणार असून, शहर आणि ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा २७ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निकषांनुसार रस्ते तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे.

रस्ते विकासामुळे वाहतुकीसह पर्यटनालाही चालना
सायकल स्पर्धेसाठी रस्त्यांचा कायापालट होणार असला, तरी यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतुकीला गती मिळणार आहे. पर्यटनस्थळे, किल्ले, धरणे आणि धार्मिकस्थळांनाही या रस्त्यांच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार रस्त्यांची कामे करण्यात येतील. येत्या १५ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन १०० दिवसांत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  — भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे
To Top