सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे रेल्वे स्थानकावरील पॉईंटची क्षमता वाढवण्यासाठी रविवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत तब्बल ९ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अभियांत्रिकी, सिग्नल, दूरसंचार आणि विद्युत विभागाकडून ट्रॅक सुधारणा व अन्य तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.
या कामांतर्गत यार्डातील डीडीएस पॉईंटची क्षमता ५२ किलोवरून ६० किलोपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे स्थानकातून धावणाऱ्या तसेच पुण्याकडे येणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
काही गाड्या पूर्णपणे रद्द
ब्लॉकच्या कालावधीत पुणे-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-पुणे एक्स्प्रेस आणि सातारा-पुणे डेमू रद्द राहतील. तसेच दौंड-पुणे आणि पुणे-दौंड या दोन डेमू गाड्याही २३ ऑगस्ट रोजी धावणार नाहीत.
पुण्याऐवजी इतर स्थानकांवर थांबणार गाड्या
खडकी : जयपूर-पुणे एक्स्प्रेस आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस.
हडपसर : नागपूर-पुणे, जम्मू तवी-पुणे आणि अमरावती-पुणे एक्स्प्रेस.
दौंड : बारामती-पुणे डेमू.
शिवाजीनगर : लोणावळा आणि तळेगावहून येणाऱ्या काही लोकल गाड्या.
इतर स्थानकांवरून सुटणार गाड्या
पुणे स्थानकाऐवजी काही गाड्या खडकी व हडपसर येथून रवाना करण्यात येणार आहेत.
खडकी येथून : पुणे-जयपूर एक्स्प्रेस सायंकाळी ५.३५ वाजता आणि पुणे-मुंबई एक्स्प्रेस सायंकाळी ५.५५ वाजता सुटेल.
हडपसर येथून : पुणे-नागपूर एक्स्प्रेस सायंकाळी ५.४५ वाजता रवाना होईल.
तसेच पुणे-कोल्हापूर डेमू साताराहून सोडण्यात येईल, तर पुणे-लोणावळा लोकल शिवाजीनगर स्थानकातून रवाना केली जाणार आहे.
दरम्यान, या विशेष ब्लॉकमुळे मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसला लोणावळा ते शिवाजीनगरदरम्यान सुमारे ४० मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी २३ ऑगस्ट रोजी प्रवासाचे नियोजन करताना गाड्यांच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी.
