Pune News l चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठी तातडीने आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. पावसाळ्यात रस्ते दुरुस्त करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्री-कास्ट रस्ते तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅचसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चाकण-तळेगाव परिसरातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १४ विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून तातडीने कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी. दर शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन ती कामे तातडीने पूर्ण करावीत. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रस्ते, पाणी, वीज, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या परस्परांशी निगडित सुविधांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
चाकण शहरातील रस्त्यांच्या कडेला पडलेले खड्डे बुजविण्यास प्राधान्य देण्याबरोबरच आवश्यक ठिकाणी नवीन अंतर्गत रस्ते, पर्यायी मार्ग आणि उड्डाणपूल उभारणीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चाकण शहराच्या विकास आराखड्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
वीज समस्येवर उपाय म्हणून महापारेषणकडून ३१ ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि रुग्णालयांसाठीही एमआयडीसीकडून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव आणि चाकण एमआयडीसीला जोडणारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तसेच उरण, कर्जत, राजगुरुनगर, शिरूर आणि पुणे यांना जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, उद्योजक आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन असून चाकण आणि तळेगावसारख्या औद्योगिक पट्ट्यांची त्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत वाहतूक कोंडी, खड्डे आणि अन्य समस्यांपासून उद्योजक व नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
Tags
To Top