Purandar Crime l पुरंदर हादरले...! कोळविहारे येथे १० वर्षीय चिमुकली वर अत्याचार : जेजुरी पोलीसांनी आवळल्या ६० वर्षीय आरोपीच्या मुसक्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
जेजुरी : पंढरीनाथ शिंदे 
पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथे १० वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. झुंबर सिताराम खोमणे (वय ६०, रा. कोळविहीरे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोळविहीरे गावाच्या हद्दीतील दिलीप खैरे यांच्या सीताफळाच्या बागेत ही घटना घडली. बालिका अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिला फसवून बागेत नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर पीडित बालिकेच्या नातेवाईकांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१), ६४ (२)(i), ६४ (२)(k), ६५ (२), ३५१ (२)(३) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक २२७/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जेजुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता राणे करत आहेत. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.
To Top