Daund News | पारगावात भीषण अपघात; मालवाहतूक पिकअपच्या धडकेत भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
दौंड : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील पारगाव येथे मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात नातवाला भेटून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या सख्ख्या भाऊ-बहिणीचा मालवाहतूक पिकअपच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मोहन बाबासाहेब ताकवणे (वय ५८) आणि सुभद्रा मानसिंग शितोळे (वय ६०), दोघेही रा. ताकवणे वस्ती, पारगाव, ता. दौंड, जि. पुणे, अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने ताकवणे वस्ती आणि पारगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
ही दुर्दैवी घटना मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी चारच्या सुमारास शिरूर-चौफुला रस्त्यावर ताकवणे मळा ते पारगाव दरम्यान घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहन ताकवणे आणि सुभद्रा शितोळे हे नातेवाईकाला भेटण्यासाठी पारगाव येथे आले होते. भेट आटोपून दोघेही दुचाकीवरून ताकवणे वस्ती येथील आपल्या घरी परतत असताना चौफुला बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहतूक पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की दुचाकी काही अंतरावर फेकली गेली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले आणि दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
एकाच कुटुंबातील सख्ख्या भाऊ-बहिणीचा काही क्षणांत दुर्दैवी अंत झाल्याने ताकवणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शिरूर-चौफुला रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, तसेच या मार्गावर आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारून पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा शिरूर-चौफुला रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेचा आणि भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Tags
To Top