सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
सातारा शहरातील अतिक्रमणांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर बुलडोझर चालेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, समर्थ मंदिर चौकातील कारवाईनंतर या मोहिमेचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. सध्या गोडोली परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू असली, तरी शहरातील प्रमुख चौक, मुख्य मार्ग आणि मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमणांनी पुन्हा हात-पाय पसरले आहेत.
राधिका रोड, पोवईनाका, बसस्थानक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, करंजे नाका ते मोळाचा ओढा या मार्गावर मोठ्या प्रमाणात टपऱ्या आणि खोकी उभी राहिली आहेत. जिल्हा परिषद चौक ते जरंडेश्वर नाका तसेच बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातही अतिक्रमणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
राजवाडा परिसरातील परिस्थितीही गंभीर बनली आहे. राजवाडा-राजपथ-शाहू चौक ते पोवईनाका या मार्गावरील फुटपाथवर दिवसेंदिवस टपऱ्या आणि खोक्यांची संख्या वाढत आहे. मोती चौक, शनिवार चौक, शेटे चौक, मुख्यालय ते पोवईनाका या मार्गावरही अशीच परिस्थिती आहे. मुख्य मार्गांवरून फुटणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही अतिक्रमणे वाढत असल्याने पादचाऱ्यांसाठी असलेले फुटपाथ कमी होत चालले आहेत. पोवईनाका -सभापती निवास-बसस्थानक-नेताजी सुभाषचंद्र बोस चौक-करंजे नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरही टपऱ्या आणि खोक्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा परिषद चौक ते करिअप्पा चौक तसेच जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याचे दिसून येते.
पालिका हद्दीतील वाढे फाटा चौक, अजिंठा चौक, शिवराज पेट्रोल पंपाच्या अलिकडील भागासह राजवाडा चौकातून जाणाऱ्या अंतर्गत मार्गावरही अतिक्रमणांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी टपऱ्या, खोकी आणि पान शॉपची संख्या वाढत असून काही ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत.
अतिक्रमणांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून वाहतूक व्यवस्था आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या भागात कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी पालिकेने सातत्याने कारवाई करणे आवश्यक आहे.
समर्थ मंदिर चौकातील कारवाईनंतर पालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम अधिक व्यापक करून शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, फुटपाथ आणि मोक्याच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवावीत. केवळ एखाद्या भागापुरती कारवाई न करता संपूर्ण शहरात मोठा ड्राईव्ह घेऊन अतिक्रमणांना आळा घालावा, अशी मागणी सातारकरांकडून होत आहे.
