Satara Breaking | सालपे घाटात भरधाव मालट्रकची दुचाकीला भीषण धडक; दाम्पत्याचा जागीच मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी 
सातारा-लोणंद मार्गावरील सालपे घाटाच्या शेवटच्या उतारावर भरधाव मालट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तानाजी खंडू खराडे (वय ५१) आणि रेखा तानाजी खराडे (वय ४९, दोघेही रा. तडवळे, संमत कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी (दि. २९) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी खराडे व रेखा खराडे हे हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवरून (एमएच ११ सीएफ ६८५४) प्रवास करीत होते. सालपे घाट उतरत असताना शेवटच्या उतारावर मालट्रक (एमएच १२ एसएक्स ६३७७) वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात, हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालविले. त्याने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता एवढी होती की, दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले.
अपघातानंतर चालक फरार
अपघात घडल्यानंतर मालट्रक चालकाने अपघाताची खबर न देता तसेच जखमींना उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात चालकाचा शोध घेण्याचे आव्हान लोणंद पोलिसांसमोर आहे.

या प्रकरणी प्रमोद शिवाजी खराडे (वय ३४, व्यवसाय शेती, रा. तडवळे, संमत कोरेगाव) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मालट्रक क्रमांक एमएच १२ एसएक्स ६३७७ वरील अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलिसांनी तपास सुरू केला. अज्ञात चालकाचा शोध घेण्यात येत असून, अपघाताची नेमकी परिस्थिती तपासली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक हेगडे तपास करीत आहेत.
To Top